पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजी नगर, पुणे येथील मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य निवेदिता एकबोटे यांना राज्य शासनाच्या क्रीडा युवा धोरण समितीच्या सदस्य पदावरून तात्काळ दूर करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी केली आहे. निवेदिता एकबोटे यांच्या ‘जातीयवादी व पक्षपाती’ भूमिकेमुळे एका बौद्ध तरुणाला ब्रिटनमधील नोकरी गमवावी लागल्याचा आरोप करत, अशा व्यक्तीचा समितीमध्ये समावेश करणे व्यापक सामाजिक हितासाठी अयोग्य असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
निवेदिता एकबोटे यांनी ‘जातीयवादी व पक्षपाती’ वृत्तीमुळे प्रेम बिऱ्हाडे या तरुणाला त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली. परिणामी, बिऱ्हाडे या तरुणाला ब्रिटनमधील एका कंपनीतील मिळालेली नोकरी गमवावी लागली. एका जबाबदार शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाकडून अशा प्रकारचा पक्षपात होत असेल, तर ही गंभीर बाब असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे.
क्रीडा युवा धोरण समितीवरील नियुक्तीवर आक्षेप –
निवेदिता एकबोटे यांच्या कथित जातीयवादी आणि पक्षपाती भूमिकेचा हवाला देत, महाराष्ट्र सरकारने त्यांची राज्याच्या क्रीडा युवा धोरण समितीच्या सदस्य पदावर केलेली नियुक्ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
“निवेदिता एकबोटें सारख्या जातीयवादी संकुचित व्यक्तीचा राज्यातील युवकांसाठीचे क्रीडा धोरण ठरविणाऱ्या समितीमध्ये समावेश करणे व्यापक सामाजिक हिताचा विचार करता उचित ठरणार नाही,” असे वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
युवकांच्या हितासाठी आणि सर्वसमावेशक धोरणे आखण्यासाठी अशा समितीमध्ये व्यापक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन प्राचार्य निवेदिता एकबोटे यांना क्रीडा युवा धोरण समिती सदस्य पदावरून त्वरित दूर करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.