मुंबई : देशात काही महिन्यांतच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४४ जागांच वाटप केल्याची माहिती देखील समोर आली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी निशाना साधत म्हटले की, महाविकास आघाडीत ४४ जागांचे वाटप झाले आणि ४ जागांवर चर्चा सुरू असल्याची बातमी बघितली. त्या ४ जागांमध्ये अकोल्यातील १ जागा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी राखीव ठेवल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे.
यावेळी मोकळे म्हणाले की, मुळात महाविकास आघाडीने ४४ जागांच वाटप झालं असल्याचं जाहीर करून मोकळं व्हावं. उगाच वेड घेऊन पेड गावला जाण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला आमच्याशी जुळवून घ्यायचंच नसेल तर त्याला आमचा नाइलाज आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षाला विचारात न घेता ही जागा वाटप आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी हा पक्ष विजयी घटक म्हणून पाहिला जातो. परंतु महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४४ जागांच वाटप वंचित बहुजन आघाडीला विचारात न घेता केलं असल्यची माहिती समोर आल्याने महाविकास आघाडीच्या भाजपला हरवण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना १ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीत सामील होण्यासंदर्भात पत्र दिले होते. मात्र, काँग्रेसने त्यावर अद्यापही कोणताही प्रतिसाद दिला नाहीये. महाविकास आघाडी आणि कॉंग्रेसच्या या भूमिकेचा अर्थ काय ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.