अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला येथे आयोजित भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्हाला नरकातून बाहेर काढणारा आमचा बाप आंबेडकर होता, म्हणून आम्ही गर्वाने आंबेडकर म्हणतो, अशा शब्दांत राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी अमित शहा यांच्या कथित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
उत्कर्षा रुपवते म्हणाल्या की, अमित शहा म्हणतात, ‘तुम्ही काय आंबेडकर आंबेडकर करता. एवढे नाव देवाचे घेतले असते, तर स्वर्ग प्राप्त झाला असता.’ यावर उत्तर देताना त्या पुढे म्हणाल्या, गृहमंत्री तुमची मानसिकता जातीयवादी, मनुवादी आहे. आम्हाला नरकातून बाहेर काढणारा आमचा बाप आंबेडकर होता, म्हणून आम्ही गर्वाने आंबेडकर म्हणतो.
माँ जिजाऊ स्मारकावरून सरकारला लक्ष्य –
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी अकोल्यातील माँ जिजाऊ स्मारकाच्या दुरवस्थेवरून सत्ताधारी पक्षांवर टीका केली. वंचित बहुजन आघाडीचे अकोला येथील पदाधिकारी निलेश देव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अकोल्यातील माँ जिजाऊ यांचे स्मारक धूळ खात पडले होते. अंजलीताई आंबेडकर यांनी स्वतः हातात झाडू घेऊन तेथे स्वच्छता केली आणि त्यानंतर झोपलेल्या सरकारला जाग आली.
ते पुढे म्हणाले, आता तेथे दोन कोटी रुपयांचे स्मारक तयार होते आहे, ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीमुळे झाले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याला प्रतिउत्तर देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व आणि वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्य या दोन्ही मुद्द्यांवर धम्म मेळाव्यात जोर दिला.