मुंबई : आझाद मैदान मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दि. ८ डिसेंबर रोजी शांती महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले होते. आज ॲड. प्रकाश आंबेडकरांनी याबाबत ट्विट करत कालच्या सभेत केलेल्या मागण्यांना अधोरेखीत केले आहे.
काल वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या सभेत, विविध धार्मिक समुदायांच्या प्रतिनिधींनी भारत सरकारला गाझावरील इस्रायलच्या युद्धाचा तात्काळ आणि बिनशर्तपणे निषेध करण्याची, पॅलेस्टिनी लोकांसाठी बिनशर्त एकता व्यक्त करण्याची व लोकांची सामूहिक शिक्षा थांबवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर कायमस्वरुपी युद्ध थांबवण्याची देखील मागणी केली असल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.
यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ टरबूज चिन्हाचा सूचक वापर केलाय. पॅलेस्टाईनमध्ये टरबूज हे लोकप्रिय फळ आहे. तसेच टरबुजात पॅलेस्टाईनच्या झेंड्यातील चार रंगाचा समावेश आहे. त्यामुळेसुद्धा पॅलेस्टाईन जनतेमध्ये हे फळ लोकप्रिय आहे.
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षावर वंचित बहुजन आघाडी सतत लक्ष वेधतोय. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याचे देशावर आणि जगावर काय परिणाम होतील? याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण देखील त्यांच्या भाषणात केले होते.