नाशिक : नाशिकमधील तपोवन परिसरात कुंभमेळाव्यातील साधुग्राम प्रकल्प उभारण्यासाठी वृक्षतोड करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यानंतर या निर्णयावर जोरदार विरोध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “गिरीश महाजन जर वृक्षतोड करणार असतील, तर वंचित बहुजन आघाडी त्यांना नाशिकमध्ये फिरू देणार नाही.
झाडांवर कुठलाही हल्ला सहन केला जाणार नाही.”या वृक्षतोडीमुळे पर्यावरण संतुलन धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जैवविविधता नष्ट होण्याची भीती निर्माण होऊ शकते, अशा चिंतेतून विविध समाज घटकांनी वृक्षतोड रोखण्यासाठी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
वृक्षतोड रोखण्यासाठी सुरु असलेल्या लढ्याला वंचित बहुजन आघाडीने सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे. “झाडे वाचली तर माणसे वाचतील” या मूल्याधारे आंदोलनकर्त्यांच्या बाजूने उभे राहत पक्षाने पर्यावरण संरक्षणाच्या प्रश्नावर कठोर भूमिका घेतली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेमुळे तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला विरोधाचा स्वर अधिक तीव्र झाला असून काही दिवसांत आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.





