मुंबई : टॉरंट पॉवर आणि टॉरंट फार्मा या टॉरंट समूहाकडून भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याचा आणि त्याचा सह्याद्रीतील वृक्षतोडीच्या प्रकल्पाशी संबंध असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कर्जत परिसरातील समृद्ध जंगल आणि वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
निवडणूक रोख्यांचा हिशोब मांडत भाजपवर आरोप
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीचा संदर्भ देत राजेंद्र पातोडे यांनी सांगितले की, मे २०१९ ते जानेवारी २०२४ या कालावधीत टॉरंट समूहाने एकूण १८४ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले होते. त्यापैकी तब्बल १३७ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे भाजपने वटवले. यामध्ये टॉरंट पॉवरचे सुमारे ७६ कोटी रुपये आणि टॉरंट फार्माचे ६१ कोटी रुपये भाजपला मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
टॉरंट समूहाकडून भाजपला मिळालेला १३७ कोटी रुपयांचा निधी हा गुंतवणुकीच्या नावाखाली दिलेला राजकीय हप्ता असल्याचा आरोप पातोडे यांनी केला. भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी या निधीचा फायदा झाला; मात्र जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी या व्यवहारातून केवळ भाजपचेच राजकीय पुनर्वसन झाले, अशी टीका त्यांनी केली.
फडणवीस टॉरंट समूहाची बाजू घेत आहेत
या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस विरोधकांवर दिशाभूल करणारे कथानक पसरवल्याचा आरोप करत असल्याचे सांगत पातोडे यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“गुंतवणूक आणि वीज या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठीच आहेत. कोणाचीही उपजीविका नष्ट होणार नाही आणि समस्या उद्भवल्यास पुनर्वसन केले जाईल,” अशी भूमिका भाजपकडून मांडली जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
यावर प्रत्युत्तर देताना पातोडे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे लोकप्रतिनिधी आणि गृहमंत्री म्हणून काम करण्याऐवजी टॉरंट समूहाचे वकील म्हणून त्यांची बाजू मांडत आहेत. टॉरंट समूहाकडून भाजपला मिळालेल्या निवडणूक रोख्यांच्या पार्श्वभूमीवर या समूहाला पाठीशी घालण्यासाठीच विरोधकांच्या आरोपांना ‘खोटा प्रचार’ असे संबोधले जात असल्याची टीका त्यांनी केली.
प्रत्यक्षात, सह्याद्रीतील जंगल आणि पर्यावरणाचा बळी देऊन उद्योगपतींचे हित साधले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सह्याद्रीतील प्रकल्प तातडीने थांबवण्याची मागणी
सह्याद्रीच्या पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता हा प्रकल्प तातडीने थांबवण्यात यावा, अशी मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली.
राजकीय निधीच्या बदल्यात महाराष्ट्राची निसर्गसंपदा उद्योगपतींच्या घशात घालण्याचे हे भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप करत पातोडे म्हणाले, “पैशासाठी भाजपचे नेते कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात, हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले आहे.”
सह्याद्रीचे जंगल, पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्याऐवजी उद्योगसमूहांच्या हिताला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.



