वंचितने घेतली अधिकाऱ्यांची भेट : भटक्या विमुक्त समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घ्या
वैजापूर : चोरीच्या खोट्या आरोपावरुन सागर वाघडकर यांच्यावर ग्रामीण पोलिस स्टेशन वैजापूर येथे २२ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटक्या समाजातील सागर वाघडकर, बजरंग गरड आणि किरण गजर या तीन तरुणांवर चोरीचा खोटा आरोप ठेवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य असून, क्रूर माणसांच्या समूहांनी या तिघांनी चोरी केल्याचे कबूल करावे म्हणून सकाळी 10 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत गोडाऊनच्या शटरमध्ये कोंडून ठेवले. तसेच त्यांना जीव मारण्याची धमकी देत बेदम मारहाण करण्यात आली.
राईन पाड्यासारखे कुठलीही विचारपूस न करता त्यांचे ओळखपत्र न बघता त्यांची शहानिशा न करता भटका समाज अजूनही क्रूर माणसांची शिकार बनत आहे. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी पोलिस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच निरपराध तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.अरुण जाधव, सखाराम शिणगारे, जाकिर पठाण, अंकुश पठारे, अरुण सोनवणे, सुदाम पाटील, दौलत पाटील, काशिनाथ वायकर, नारायण गदाई पाटील, संतोष चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक कौटाळे यांनी सखोल तपास करून कोणावरही अन्याय होणार नाही, असे काम केले जाईल अशी हमी भटक्या विमुक्ताच्या शिष्टमंडळास दिली आहे.