– संजीव चांदोरकर
तो” म्हणाला तुम्ही निगेटिव्ह बोलता ;
तरुणपणासून जवळपास दररोज दारू पिऊन त्याची लिव्हर खराब झाली आहे आणि आज तो हॉस्पिटल मध्ये आहे; रोगाच्या लक्षणांना उतार नाही. त्याला सांगितले कि डॉक्टर्स त्यांचे काम करत आहेत. पण तुला बरे वाटायचे असेल तर तू आतापर्यंत जे करत होतास त्यात आमूलाग्र बदल करावे लागतील…
तर तो भडकला , म्हणाला तुम्ही निगेटिव्ह बोलू नका / फक्त टीका करू नका. concrete suggestions द्या.
म्हणजे हा काहीही बदल करणार नाही. दारू पितच राहाणार आणि आपण त्याची लिव्हर कशी ठीक होईल याबद्दल डोकेफोड करायची ? जो उपाय आहे तो त्याच्याच हातात आहे.
तो” म्हणाला तुम्ही निगेटिव्ह बोलता ;
त्याने पैसे उधळून तरुणपणापासून खा खा खाल्ले, व्यायाम नाही. शिस्त नाही. “डोन्ट वरी बी हॅपी” सारखे उथळ तत्वज्ञान पाजळले. त्यातून ओव्हरवेट होऊन याला रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि तत्सम विकार झाले आहेत
त्याला सांगितले कि तू बरा होऊ शकतोस पण तुला तुझी लाइफस्टाइल बदलावी लागेल.
तर तो भडकला , म्हणाला तुम्ही निगेटिव्ह बोलू नका / फक्त टीका करू नका. concrete suggestions द्या.
म्हणजे हा काहीही बदल करणार नाही. खातच राहणार, कोणतीही शिस्त पाळणार नाही, आणि याला क्विक फिक्स सोल्युशन आपण द्यायचे.
ते म्हणतात “तुम्ही सारखी राजकीय / आर्थिक व्यवस्थेवर टीका करता, निगेटिव्ह बोलता”. Concrete suggestions देत नाही.
काय सूचना देणार?
जीडीपीजम, सेन्सेक्सजम म्हणजे देशाची अर्थव्यवस्था हे रुजवून आकडेवारीशी खेळ करून मॅक्रो चित्र चकचकीत ठेवले; जागतिक बँक, नाणेनिधी यांची सर्टिफिकेट मिरवणे, अपरिपक्व परराष्ट्रनीती आणि परराष्ट्रनीतीचा देशाच्या अर्थव्यवस्थेशी जैव सबंध असतो याचा विसर; परकीय चलन हा चोक पॉइंट आहे हे विसरून खनिज तेलाच्या वापरावर आधारित खाजगी वाहनाना प्रोत्साहन, सोने आयात प्रोत्साहन, श्रीमंतांना डॉलर्स विकत घेऊन परदेशात रियल इस्टेट घेऊ देणे, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात वाढ नाही, देशातील खासगी कॉर्पोरेट आणि एफ डी आय यांना देशात भांडवली गुंतवणुकीसाठी अनुत्साह, दुसऱ्या बाजूला फक्त दोघांची भरभराट, अर्धी लोकसंख्या तरुण असताना रोजगारनिर्मितीकडे अक्षम्य दुर्लक्ष , ७० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असताना शेतीक्षेत्राला सापत्न वागणूक , पर्यावरणीय हानी, शिक्षण, आरोग्य खाजगी क्षेत्राला आंदण दिले, एका बाजूला टोकन कॅश ट्रान्सफर आणि दुसऱ्या बाजूला लाखो कोटी रुपयांची रिटेल लोन यावर सारी मदार, विविध प्रकारचा भ्रष्टाचार…. भली मोठी यादी आहे.
आजची देशाची अर्थव्यवस्था स्थिती ही यांनीच एकहाती तयार केली आहे.
या सरकारचे एकेकाळचे समर्थक, सल्लागार राहिलेले मोठे लोक सांगत आहेत की आखाती युद्ध फक्त कारण झाले आहे देशाच्या अर्थव्यवस्थेतील ताणतणाव अनेक वर्षे वाढत होते. ते बोलले की हे गुळणी करून गप्प बसतात. राजकीय विरोधक बोलले की आरोप करतात निगेटिव्ह बोलतो म्ह्णून.
दुसरे सर्वात महत्वाचे आर्थिक धोरणे बदलणे आणि त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदी हा फक्त आणि फक्त शासनाचा विशेषाधिकार आहे. यांच्याकडे सूचनांची काय कमी आहे.
राज्यकर्ते आपली आर्थिक धोरणे सुरूच ठेवणार, गाभ्याला हात घालणार नाहीत. दुसऱ्यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना सांगत बसायचे. अगदी दिल्या concrete suggestions. राज्यकर्ते guarantee देणार का त्या अंमलात आणल्या जातील म्हणुन…. तसे आश्वासन काही हे देणार नाहीत. द्या आश्वासन…मोठे मोठे अर्थतज्ज्ञ पुढे येतील.
कोणीही निगेटिव्ह बोलू नये. निगेटिव्ह म्हणजे काय ? तर आमच्यावर टीका करू नका. आम्ही तसेच वागणार.





