मुंबई: वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिलेल्या मतदारसंघांची यादी ही गेल्या पाच वर्षांपासून ज्या जागांची तयारी पूर्ण ताकदीने करण्यात आली होती, त्या जागांची आहे. महाविकास आघाडीसोबत येण्याआधीची ही यादी असून, त्या अशा जागा आहेत, ज्या ठिकाणी वंचितला जिंकण्याची खात्री होती. त्यामुळे वंचितने अद्याप किती जागा हव्यात, याबाबत कोणतीही मागणी केलेली नाही.
महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे चार प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी वंचित बहुजन आघाडीने एक प्रस्ताव मविआला दिला असून, ज्या जागांवर युती होण्याआधी वंचितने तयारी केली आणि जिथे जिंकण्याची खात्री होती, त्या जागांची माहिती विश्वासाने मविआला दिली आहे. वंचितच्या या मागणीवर अंतर्गत चर्चा करून आणखी एक बैठक घेण्यास महाविकास आघाडीने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आणखी एका बैठकीनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.