वर्धा : डोंगरगाव वर्धा रोड येथील वैनगंगा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनातर्फे मिळणाऱ्या एकूण विद्यावेतनाच्या ६०% रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामधे थेट जमा होण्याअगोदरच महाविद्यालयामध्ये फी जमा करा अन्यथा परिक्षेचा अर्ज भरू देणार नाही असा तुगलकी फरमानच महाविद्यालयाने काढला. सदर प्रकाराची तक्रार प्राप्त होताच वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी आज महाविद्यालयामधे जावून आक्रमकपणे विद्यार्थ्यांची बाजू मांडली. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांचे परिक्षेचे अर्ज थांबवले जाणार नाही, येत्या मंगळवारला सर्व अर्ज जमा केले जातील असे आश्वासन महाविद्यालयातर्फे देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानी दिनांक १७ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाला भेट दिली. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात केंद्र, राज्य सरकार व विद्यापीठाच्या नियमांचे पालन करावे अन्यथा एट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आंदोलनात्मक भुमिका घेवू अशी भूमिका यावेळी वंचित बहुजन आघाडीने घेतली.
शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ७ दिवसांचे आत महाविद्यालयाची फी भरण्याचा नियम आहे, परंतु शिष्यवृत्ती प्राप्त होण्याच्या अगोदरच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खिशातून महाविद्यालयाची फी भरावी असे महाविद्यालयातर्फे सांगितले गेले, तेव्हापर्यंत विद्यापीठाच्या परिक्षेचे अर्जच भरण्यास विद्यार्थ्यांना मज्जाव करण्यात आला, हे राज्य तथा केंद्र शासनाच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन असून, यासमोर असे प्रकार घडले तर संबंधीत महाविद्यालयाविरोधात एट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल असे वंचित चे आय टी सेल प्रमुख सिध्दांत पाटील यांनी सांगितले.
महाविद्यालयातील अधिकाऱ्यांसोबत चर्चेअंती सर्व विद्यार्थ्यांचे परिक्षा अर्ज स्विकारले जातील असे आश्वासन महाविद्यालयातर्फे देण्यात आले.
यावेळी, वंचित चे सिध्दांत पाटील, मनिष बोरकर, धम्मदीप लोखंडे, यश कुंभारे, अनिकेत कुत्तरमारे, आनंद मेश्राम, अमोल हाडके, शुभम कांबळे, आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.