आंध्रप्रदेश : मध्यरात्रीची वेळ… प्रवासी गाढ झोपेत… आणि अचानक आगीच्या ज्वाळांनी डब्यांना विळखा घातला. आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसला (१८१८९) लागलेल्या भीषण आगीत ७० वर्षीय वृद्ध प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
सोमवारी पहाटे १:३० च्या सुमारास विशाखापट्टणमहून एर्नाकुलमच्या दिशेने जाणारी ही ट्रेन एलामंचिली रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली होती. अचानक पॅन्ट्री कारला लागून असलेल्या B-1 आणि M-2 या एसी कोचमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. लोको पायलटने प्रसंगावधान राखून गाडी तत्काळ थांबवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, तरीही दोन डबे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत.
बचावासाठी प्रवाशांच्या उड्या
आगीचा भडका उडताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली. डब्यांमध्ये धूर भरल्याने श्वास घेणे कठीण झाले होते. जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून बाहेर उड्या घेतल्या. दुर्दैवाने, विशाखापट्टणमचे रहिवासी चंद्रशेखर सुंदर (७०) यांना जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक जाम (Brake Binding) झाल्यामुळे निर्माण झालेल्या घर्षणामुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सहाय्यक लोको पायलटने ब्रेकची तपासणी केली असता डब्यातून ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत काही तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.






