भयभीत बौद्ध समाजाला मनोबल देण्यासाठी व गावात शांतता निर्माण करण्यासाठी वंचित नेत्यांचे आवाहन
परभणी :पाथरी तालुक्यातील मौजे खेरडा या गावातील जातीयवादी गुंडांनी विकास गंगाधर वाघ यांना रस्त्यावर अडवून मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली, जातीवाचक शिवीगाळ केली व बौद्ध महिलांबद्दल अभद्र वाच्यता केली यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. भयभीत ग्रामस्थांना आधार देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रवक्ते डॉ. धर्मराज चव्हाण, प्रशिक्षक डॉ. सुरेश शेळके, ऍड. अशोक पोटभरे, यांच्या सोबत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य सचिव, यशवंत मकरंद, ओबीसी नेते, जी. डी. पोले, डॉ. कन्हैया पाटोळे, खुर्शीद शेख तसेच पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी भेट दिली.
यावेळी नांदेड परिक्षेत्रातील पोलिस तपास अधिकारी श्री. चेन्ने साहेब यांनी याप्रकरणी गुन्ह्याचा योग्य तपास केला जाईल व त्यावर गंभीरपणे कारवाई होईल अशी ग्वाही शिष्टमंडळास दिली. खेरडा गावातील आरोपीचा जातीयवादी मानसिकतेचा व्हिडीओ सोशल मीडियावर महाराष्ट्रभर व्हायरल झालेला आहे.
आरोपी रामचंद्र आमले व दगडु रामभाऊ आमले यांच्या पत्नी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आहेत.
सर्व ग्रामस्थांनी खेर्डा ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आणली होती. परंतु विकृत मानसिकता ठेवून या दोघांनी दोन समाजातील वातावरण बिघडविले आहे. आरोपीने विकास वाहेळ यांना मारहाण केली तसेच सार्वजनिक ग्रामपंचायतचे पाणी देण्यास नकार दिला व बौद्ध महिलेचा विनयभंग करीत गावात अशांततेचे वातावरण तयार केले. गावातील बौद्धांना किराणा दुकानावर बंदी, पिठाची गिरणी बंद, शेतात कामाला बोलण्यावर बहिष्कार करण्यात आला आहे.
डॉ. सुरेश शेळके व डॉ. धर्मराज चव्हाण यांनी गावात शांतता राहावी यासाठी आवाहन केले आरोपींना कठोर शासन होईल यासाठी वंचित बहुजन आघाडी पीडितां सोबत असेल याची ग्वाही दिली.
या प्रकरणात लोकप्रतिनिधी असलेले खासदार व आमदार यांनी अद्याप ही प्रत्यक्ष भेट दिलेली नाही. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून खेरडा गावातील सरपंच व सदस्य यांना त्वरित निलंबित करून ग्रामपंचायत बरखास्त करावी, आरोपींना रासुका लावून जिल्हा हद्दपारीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.