वसई: वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराने महाराष्ट्र धुमाकूळ माजवला आहे. या महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जिल्ह्यात सभेचा धडाका सुरू आहे. त्यांच्या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वसई विरार मध्ये सुजात आंबेडकर यांची भव्य सभा उत्साहात पार पडली.
सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत वसई-विरारच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी शहरातील नागरी समस्यांवर बोट ठेवले.
ते म्हणाले की, वसई-विरारचा विस्तार वेगाने होत आहे, परंतु त्या प्रमाणात येथील नागरिकांना सोयी-सुविधा मिळत नाहीत. आजही येथील जनतेला वेळेवर पाणीपुरवठा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास शहरात सर्वसामान्यांना परवडतील अशा उत्तम आणि आधुनिक आरोग्य सुविधांची निर्मिती करणे ही आमची प्राथमिकता असेल.
तसेच रस्ते, सांडपाणी व्यवस्था आणि दर्जेदार नागरी सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे.

पुढे ते म्हणाले, वसई-विरारच्या प्रगतीसाठी आता नव्या विचारांच्या आणि तळमळीने काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.
“केवळ घोषणा नको तर प्रत्यक्ष कृती हवी असेल, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी या जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेने निवडणुकीच्या वातावरणात मोठी चुरस निर्माण केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून होणाऱ्या धडाडीच्या सभेचे सर्वत्र चर्चा होत आहे. या सभेला स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सुजात आंबेडकरांच्या या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाले.






