ऐरोली : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नवी मुंबईतील ऐरोली, सेक्टर ३ येथे भव्य ‘कॉर्नर सभा’ घेतली. या सभेला स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. नवी मुंबईतील स्थानिक प्रश्न, बेरोजगारी आणि शिक्षणाचे बाजारीकरण या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. सामान्य जनतेचा आवाज विधिमंडळात पोहोचवण्यासाठी आता बदलाची गरज आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ऐरोली सेक्टर ३ मधील या कोपरा सभेसाठी मोठ्या संख्येने निळे निशाण हाती घेऊन कार्यकर्ते जमले होते. सुजात आंबेडकर यांचे आगमन होताच घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.






