मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रभागात वंचित बहुजन आघाडीकडून सभा घेतली जात आहे. यामुळे संपूर्ण मुंबई दणाणून गेली आहे. तसेच या सभांना नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या वॉर्ड क्रमांक ११६ च्या अधिकृत उमेदवार राजकन्या विश्वास सरदार यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मैदानात उतरून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कॉर्नर सभेला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या कॉर्नर सभेमध्ये सुजात आंबेडकर यांनी महापालिकेतील भ्रष्टाचार आणि जनसामान्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. “मुंबईच्या विकासासाठी आणि वॉर्ड क्रमांक ११६ मधील स्थानिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी सुशिक्षित आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या राजकन्या सरदार यांना विजयी करा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वंचित आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह
ही सभा वॉर्डातील महत्त्वपूर्ण चौकात पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युती झाल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे चित्र या सभेत पाहायला मिळाले.
यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सुजात आंबेडकरांच्या या सभेमुळे वॉर्ड क्र. ११६ मधील निवडणुकीची चुरस अधिकच वाढली आहे.





