मुंबई : वंचित बहुजन आघाडी (VBA) आयोजित ऐतिहासिक ‘संविधान सन्मान महासभा’ साठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे जय्यत तयारी झाली असून, युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज (सोमवार) सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. ही महासभा उद्या, २५ नोव्हेंबर रोजी होत आहे.
सुजात आंबेडकर यांनी शिवाजी पार्क येथील महासभेच्या ठिकाणाला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला आणि तयारीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी माहिती दिली की, देशभरातील संविधानवादी जनता मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहणार आहे.
यावेळी त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, कमलेश उबाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट –
वंचित बहुजन आघाडी दरवर्षी ‘संविधान सन्मान सभा’ आयोजित करणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
संविधान दिन २६ नोव्हेंबरला असतो, तरीही २५ नोव्हेंबरला सभा घेण्यामागचे महत्त्वाचे कारण सुजात आंबेडकर यांनी पुन्हा सांगितले:
जेव्हा संविधानाचा मसुदा (Draft) तयार झाला, त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे भाषण झाले होते. त्या भाषणातील महत्त्वपूर्ण मुद्दे परत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी ही महासभा २५ नोव्हेंबरला आयोजित केली जात आहे.
पक्षाचे उद्दिष्ट संविधान सभेचे महत्त्व टिकवून ठेवणे असून, दरवर्षी ही सभा आयोजित करण्याचा संकल्प वंचित बहुजन आघाडीने केला आहे.





