सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी आणि मलिकपेठ या दोन गावांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुराने मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी बांधवांची पिके पाण्याखाली गेली.
तसेच अनेक ग्रामस्थांची घरे पाण्यामध्ये गेल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.
दरम्यान, सुजात आंबेडकर यांनी उपस्थित नुकसानग्रस्तांना धीर देत, “वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, ज्यांची घरे पाण्यामध्ये गेली आहेत, अशा सर्व वंचित आणि नुकसानग्रस्तांची लवकरात लवकर यादी तयार करून ही यादी तातडीने शासनाला सादर करू, पूरग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू”, असे आश्वासन दिले.