अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवून जिंकण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर संवाद दौरे सुरू आहेत. याच दौऱ्याचा एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा अकोला जिल्ह्यात ‘चर्चा दौरा’ सुरू आहे.
बार्शिटाकळी येथे आयोजित चर्चा दौऱ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुजात आंबेडकर उपस्थित होते. त्यांनी यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषदेमार्फत झालेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेमार्फत वंचित जाती समूहांना संधी दिली. ग्रामीण भागात आरोग्य केंद्र, रस्ते, पाणीपुरवठा, शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप, शिक्षण व्यवस्था सुरळीत ठेवणे अशी कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने केली.”
जातीय भेदभावामुळे दलित तरुणाला यूकेमधील नोकरी गमवावी लागली; प्रकाश आंबेडकरांचा मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्यांवर गंभीर आरोप
यावेळी सुजात आंबेडकरांनी प्रस्थापित लोकप्रतिनिधींना थेट आव्हान दिले. “आता जनतेने सातत्याने निवडून दिलेल्या प्रस्थापित आमदार आणि खासदारांना विचारावं की त्यांनी अकोला जिल्ह्यासाठी काय केलं?” असा रोखठोक सवाल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित केला.
या चर्चा दौऱ्याला वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर यांच्यासह अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.