नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-२०२५ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे प्रचारसभा घेतली. प्रस्थापित पक्षांना बाजूला सारून विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. सम्यक संबुध्द बुध्द विहार परिसर, रमा नगर येथे आयोजित केलेल्या या जाहीर सभेला नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
‘मटण, पाकीट, दारू’ नव्हे, विकासाच्या मागे मत उभे करा!
सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून मतदारांना महत्त्वपूर्ण आवाहन केले. ते म्हणाले, “आपले मत मटण, पाकीट, दारूच्या मागे उभे करू नका. आपले मत प्रस्थापित पक्षांच्या बाजूला देऊ नका, तर तुमचे मत हे विकासाच्या म्हणजेच गॅस सिलेंडरच्या मागे ठेवा.”पैसा, दारू किंवा तात्पुरत्या आमिषाला बळी न पडता, विकासाच्या मूळ मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून मतदान करण्याचे स्पष्ट आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्थानिक विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. स्थानिक पातळीवर नेतृत्व बदलल्याशिवाय सामान्य नागरिकांचा विकास होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
“आपल्याला स्थानिक पातळीवर आपला विकास करायचा असेल, तर आपल्याला आपल्या हक्काचे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आणून सत्ता मिळवणे गरजेचे आहे,”
सुजात आंबेडकर यांच्या या प्रचारामुळे नागपूर परिसरातील निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना बळ मिळाले आहे.





