४० वर्षीय तरुणाला दिले जीवदान; डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक!
पिंपरी चिंचवड – शहरातील महानगरपालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात एका 40 वर्षीय पुरुष रुग्णाच्या पोटाच्या आताड्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. असा पोटदुखी, लघवी, संडास न होणे या लक्षणांनी हा रुग्ण त्रस्त होता. त्याला थेरगाव रुग्णालयातील डॉक्टरांनी जीवनदान दिले. हा 40 वर्षीय तरुण रुग्ण दोन दिवसांपासून असह्य पोटदुखी, लघवी, संडास न होणे या लक्षणांनी त्रस्त होत. प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयातून पालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयातील तातडीच्या विभागात हलविण्यात आले. प्रारंभिक तपासणीत रुग्ण बेशुद्ध अवस्थेत आहे. मूत्रपिंड निकामी झाले असून हाताच्या नाडीचे ठोके लागत नसल्याचे आढळले. रुग्णाला नळीद्वारे कृत्रिम श्वासोच्छवास चालू करून हृदयाचे ठोके वाढवण्याची औषधे सुरू केली.
अतिदक्षता विभागात डॉ. संजय सोनेकर यांच्या देखरेखीखाली हलविण्यात आले. त्याची तपासणी केली असता सिटीस्कॅनमध्ये आतड्याला छिद्र पडून पोटात पू जमा झाला होता. रक्तातील वाढलेल्या पांढऱ्या पेशींची संख्या, रक्तक्षय, कमी प्लेटलेट, यकृत व मूत्रपिंडाचे विस्कळीत रक्त चाचणी अहवाल, उच्च प्रोलॅक्टीन पातळीमुळे रुग्ण सेप्टिक शॉक मध्ये असल्याचे जाणवले. शस्त्रक्रिया विभागातील डॉ. कांचन वायकुळे, डॉ. रोशन, डॉ. ज्ञानेश आणि भूलतज्ञ डॉ. मनीष पवार यांच्या टीमने इमर्जन्सी ‘एक्सप्लोरेटरी लॅप्रोटॉमी’ ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
रुग्णाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे डॉ. संजय सोनेकर यांच्या देखरेखीखाली रुग्ण तीन दिवस व्हेंटिलेटरवर राहिला. रुग्णाला रक्तवाहिनीद्वारे पूर्ण आहार पुरविण्यात आला. सहाव्या दिवशी रुग्णाला वार्डमध्ये हलविले गेले. दहाव्या दिवशी रुग्णाला सुखरूप स्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. थेरगाव रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी पुरविलेल्या योग्य कुशल मनुष्यबळ, सर्व सुविधा व खंबीर पाठिंबा यामुळे अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला महापालिकेच्या रुग्णालयात जीवदान मिळाले.
वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, “महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचा-यांची टीम चांगली काम करत आहे. लोकांना चांगली सेवा मिळत आहे. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या जात आहेत. रुग्णालयात आणखी चांगली सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.