वीर दास इथल्या दांभिक राजकारण्यांवर बोलतो, इथल्या राष्ट्रीय ऐक्यावर, पेट्रोल डिझेल वाढीवर बोलतो, बॉलिवूड वर बोलतो, बलात्कारावर ही बोलतो परंतु त्याच्या समूहाने साडे पाच हजार वर्षांपासून माजवलेल्या गोंधळाकडे त्याची साधी तिरकी नजर ही पोहचत नाही.
देशात स्टँड अप कॉमेडी बघायला जाणारा जो ठरावीक वर्ग आहे. जो प्रामुख्याने इथला उच्चभ्रू, सवर्ण वर्ग आहे. त्यात अँटी बीजेपी म्हटला की, त्याला एखाद्या रिव्होलेशनरी फॉर्म मध्ये नेऊन फक्त सुस्कारा सोडलं की क्रांती वगैरे येते की काय? याच पद्धतीने त्याचं कौतुक केलं जातं. मागे कुणाल कामरा बद्दल ही तसंच झालं होतं. परंतु, अँटी बीजेपी म्हणजे पुरोगामी असा समजणारा वर्ग ‘पुरोगामीत्व’ या शब्दाला खूजं करतो हेच वास्तव आहे. मोदीवर विनोद करणारे उच्चभ्रू कॉमेडीयन हे निव्वळ बाजारू आहेत, हे समजून घेतलं पाहिजे.
‘वीर दास’ ही याच सवर्ण पुरोगामी प्रकारात मोडणारं एक मोठं नाव आहे. त्याच्या व्हिडीओने देशभर गलका केल्यामुळे त्याला सेफ झोन मध्ये ठेवण्यासाठी इथले पुरोगामी लगेच धावून आले आहे. काहींनी त्याच्या कवितेला मंगेश पाडगावकरांच्या ‘सलाम’ कवितेसोबत ही जोडलं आहे. या देशात दोन भारत असल्याचा त्याचा दावा बरोबरच आहे. परंतु, हे निरीक्षण किती संकुचित आणि दांभिक आहे यावर साधी चर्चा ही केली जात नाही. कदाचित, मुद्दामच ती चर्चा बायकॉट करायची हे ठरवून केलेलं हे षंडयंत्र आहे असंच काहीसं चित्र दिसत आहे. किंवा या उपर जर कोणी व्यक्त ही झालं तर त्यालाच संकुचित आणि बुद्धिभेद करणारा ठरवून मोकळं व्हायचं हा ब्राम्हणी वर्तनाचा भाग तथाकथित पुरोगामी वर्ग ही असाच फॉलोव करतो हेच मुळात हास्यास्पद आहे.
वीर दास इथल्या दांभिक राजकारण्यांवर बोलतो, इथल्या राष्ट्रीय ऐक्यावर, पेट्रोल डिझेल वाढीवर बोलतो, बॉलिवूड वर बोलतो, बलात्कारावर ही बोलतो परंतु त्याच्या समूहाने साडे पाच हजार वर्षांपासून माजवलेल्या गोंधळाकडे त्याची साधी तिरकी नजर ही पोहचत नाही. हा त्याचा विवेकी सभ्यपणा कोणत्या तराजूत मोजला जातो हा एक वेगळाच संशोधनाचा भाग आहे. यावर ही जातीवादी ठरवण्या आधी त्याच्या दांभिकपणाचा शांतपणे विचार केला जाईल का? असा मला येथे प्रश्न उपस्थित करावासा वाटतो.
या वादात वीर दासच्या जुन्या व्हिडीओज पुन्हा वर आलेला ‘मायावती’ यांची खिल्ली उडवणारा व्हीडीयो संतप्त करणारा आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि मायावती या दोघांवर केलेल्या विनोदाच्या स्क्रिप्ट ची तुलना केली, तर वीर दास ची खदखद ही आजची नाही या मतावर आलं तर काय बिघडले? दलित आणि ते ही स्त्री नेतृत्व असणे हे किती संघर्षातून आलेलं असतं हे जाणून घेण्या इतपत यांच्या नेनिवांची मजल नाही, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे व्यक्तिगत, जातीवाचक आणि स्त्रीविरोधी टिप्पणी करून आनंद घेणाऱ्या क्राऊडच्या संवेदना ही किती भयंकर असतील याचा अंदाज बांधणं कठीण नाही. यातच रिचा चड्डा सारखी संवेदनशील समजली जाणारी आणि दलित स्त्री नेतृत्वावर चित्रपट करणारी अभिनेत्री जर वीर दासचं समर्थन करणार असेल, तर या समूहाची वैचारिक मजल किती तोकडी आहे हे स्पष्ट होतं?
मुळात, भाजपा विरोधी, अथवा त्या प्रवाहाविरुद्ध घेतलेल्या कोणाच्या ही भूमिका त्याची जात न बघता स्वागतार्ह आम्हाला वाटतात. आम्ही त्यांचं समर्थन ही करतो. त्यांच्या अभिव्यक्ती सोबत आम्ही ठाम उभं राहण्यास ही तयार असतो. परंतु, जातीच्या प्रश्नावर सवर्ण पुरोगाम्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही हे एक टोकदार वास्तव आहे. डीकास्टची टिमकी वाजवणारा हा वर्ग आजवर कधीच प्रतिनिधित्व, जातींच प्रिव्हिलेज आदी मुद्द्यांकडे वळला नाही आणि त्यावर भाष्य केलं, तरी त्यावर कृतिशून्यता त्यांनी तितक्याच मिजाजने टिकवली आहे.
कॉमेडियन हे कम्युनिस्ट असतात असं चित्र दोन्ही प्रवाहांच्या(डाव्या-उजव्या) बाजूने रंगवून स्वतःला सेटल्ड ठेवण्यासाठीचा हा अट्टहास आहे हे दिसत असल्याने डाव्या विचारसरणीच्या तरुणांकडून ही यांच्याबाबत स्तुतीसुमनेच उधळली जातात. किंबहुना, ही व्यवस्थाच आहे तशीच स्थिर ठेवण्यासाठी या तरुणांना टूल्स बनवून बाजारपेठेत वापरले जाते.
मध्यंतरी, संदीप शर्मा या कॉमेडीयन ने ब्राम्हणांवर एक स्टँड अप केलं होतं. यात त्याची स्क्रीप्ट , सादरीकरण आणि कॉमिक सेन्समुळे वरवर बघता ते फार भन्नाट वाटल्याने अनेकांनी शेअर ही केलं होतं. ‘विनोदात सत्य उगळलं’ अस म्हणत बहुजन प्रवाहातील लोकांनी या व्हिडीओला दाद दिली. परंतु, ब्राम्हणांची संवादी वृत्ती किती चलाखपणे त्याने लावून धरली याचं सर्वात सुंदर उदाहरण हीच स्क्रिप्ट आहे, असं म्हणावं लागलं आणि हा बुद्धिभेद आंबेडकरी चळवळींतील तरुणांना समजला नाही हे आपलं अपयश! तसेच, कॉमेडीयन पंकज सिंग याचे ‘कास्ट सिस्टिम’ विषयावरील विनोदी स्क्रिप्ट ही एसटी /एसटी आरक्षणावर सूड उगवणारी भासते.
एकंदरीत लैंगिक अश्लील शब्द, आरक्षण विरोधी भूमिका, वंचितांच्या मनात न्यूनगंड तयार करणे याच बाजूने संपूर्ण स्टॅंडअप कॉमेडीयनचा गोतावळा सरकत असल्याचं चित्र आहे आणि त्यांच्या बचावाला -गौरवीकरणाला सोबत सवर्ण पुरोगामी आहेच! आणि गरज भासल्यास मूग गिळून गप्प बसणे सवर्ण पुरोगामी, स्त्रीवाद्यांना बाखुबी येत असल्याने वीर दास सारख्यांच्या समर्थनार्थ उभं राहणे, हे चळवळीच्या मार्गातील गतिरोधकच असेल! ही खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधून घ्यावी!
संविधान गांगुर्डे