संजीव चांदोरकर
सौंदर्यप्रसाधने चोपडलेला चेहरा ही संपूर्ण शरीर आरोग्य संपन्न ? (आरोग्य संपन्न शरीर असणाऱ्या स्त्री-पुरुषांचा चेहरा देखील चमकदार असतो) एक काळ असा होता की नैसर्गिक आपत्ती हा शब्द मुख्यत्वे ग्रामीण भागातील मोठ्या नद्या, डोंगर, पर्वत इत्यादीसाठी वापरला जायचा. आता दर पावसाळ्यात तो देशातील शहरे आणि महानगरांसाठी वापरला जात आहे.
सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांचे होणारे नुकसान, लाखो मानवी तासांचे होणारे नुकसान, पुढचे अनेक महिने आरोग्यावर होणारे परिणाम, आणि स्वतःच्या खिशातून करावे लागणारे खर्च… याचे रुपयातील वस्तुनिष्ठ मूल्य काढण्याची हिम्मत कोणत्याही धोरण कर्त्याला, आणि नागरी नियोजनात मॅथेमॅटिकल मॉडेलिंग करणाऱ्यांकडे नाही हे तर उघड आहे. पण ती लाखो कोटी रुपयात भरेल हे नक्की.
दहा वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या “स्मार्ट सिटी मिशन” मुळे शहरी महानगरी नागरिकांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत नक्की काय फरक पडला ? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधून सौंदर्यकरणाचे , डिजिटलायझेशनचे राबवले गेलेले प्रकल्प पाण्यात वाहून गेले आहेत की तरंगत आहेत ? या सगळ्यावर नक्की किती सार्वजनिक पैसे खर्च झाले ? हे प्रश्न नागरिकांनी विचारायची गरज आहे.
२०४७ सालात भारत नक्की कसा असेल याचे विकास आराखडे तयार होत आहेत. त्यावेळी भारताची शहरी लोकसंख्या जवळपास दुप्पट म्हणजे ९५ कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला पावसाचीच नाही तर सर्वच पर्यावरणीय अरिष्टांची तीव्रता आणि वारंवारता वाढतच जाणार आहे हे निरीक्षण मनात येण्यासाठी कोणी पर्यावरणाचा शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज नाही.
काळजी व्यक्त करणाऱ्या, इशारे देणाऱ्या अशा पोस्ट लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्यांमधील अनेक जण त्यावेळी जिवंत देखील नसतील. पण आपण आपल्या मुलाबाळांची / नातवंड / पत्वंडांची काळजी करतो असा आपण दावा करत असू तर या प्रश्नांना हेड ऑन भिडावेच लागेल.
शहरांमधील महानगरांमधील पायाभूत सुविधा या खरेच इमारतीच्या पायासारख्या असतात. इमारती वर कितीही रंगरंगोटी केली आणि पाया कमकुवत असेल तर काही अर्थ नाही. मुद्दा आपण सत्ताधारी पक्षाचे समर्थक आहोत का विरोधक आहोत हा नाही. कधीच असू शकत नाही. कारण मुळात निसर्ग कानफटात लगावताना हा फरक करतच नाही.