Zubeen Garg : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार झुबीन गर्ग यांचे सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या एका अपघातात निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘या अली’ या गाण्यामुळे ते देशभरात प्रसिद्ध झाले होते.
ही घटना शुक्रवारी (१९ सप्टेंबर २०२५) घडली. झुबीन गर्ग हे सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या ‘नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. स्कूबा डायव्हिंग करताना त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तात्काळ त्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले आणि सीपीआर (CPR) देण्यात आला. त्यानंतर त्यांना सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, दुपारी २:३० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. अशी माहिती फेस्टिव्हलच्या प्रतिनिधींनी दिली.
झुबीन गर्ग यांनी प्रामुख्याने आसामी, बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी काम केले. त्यांनी ४० हून अधिक भाषा आणि बोलींमध्ये गाणी गायली आहेत, ज्यात मराठी, तमिळ, तेलुगू, नेपाळी आणि इंग्रजी अशा अनेक भाषांचा समावेश आहे. ते आसाममधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होते.
स्कूबा डायव्हिंग म्हणजे काय?
स्कूबा डायव्हिंग हे पाण्याखालील डायव्हिंगची एक क्रिया आहे. या क्रियाकलापादरम्यान, स्कूबा डायव्हर्स श्वसन उपकरणे घालून पाण्याखाली डायव्हिंग करतात. स्कूबा डायव्हिंग हा सामान्यतः एक सुरक्षित साहसी खेळ मानला जातो. ज्यांना पोहता येत नाही ते देखील प्रशिक्षित प्रशिक्षकाच्या मदतीने मूलभूत स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घेऊ शकतात. परंतु, हृदयरोग असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी हे सुरक्षित मानले जात नाही.