नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ इतिहासात आज एका नव्या सुवर्ण अध्यायाची नोंद झाली. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि नासाच्या ‘अॅक्झिअम-४’ या यशस्वी अंतराळ मोहिमेचे पायलट शुभांशु शुक्ला यांचे आज पहाटे अमेरिकेतून भारतात आगमन झाले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर उजळले आहे.
शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला (International Space Station) भेट देणारे पहिले भारतीय बनून विक्रम रचला आहे. रविवारी पहाटे त्यांचे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताच, ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांच्यासोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, त्यांचे कुटुंबिय आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी शुभांशु यांच्या पत्नी कामना शुक्ला यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शुभांशु यांच्यासोबत भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेसाठी निवडलेले दुसरे अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन प्रशांत बाळकृष्णन नायर, हेदेखील भारतात परतले.
ते या मोहिमेसाठी राखीव अंतराळवीर होते. १५ जुलै रोजी कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावरून पृथ्वीवर परतल्यानंतर, आज शुभांशु शुक्ला आपल्या मातृभूमीवर परतले आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे आणि युवा पिढीला अंतराळ प्रवासाची स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
ईव्हीएम बिघाड, गोंधळ अन् राडा! राज्यभर महापालिका निवडणुकीत मतदारांना मनस्ताप
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर...
Read moreDetails






