ठाकरे गट आणि वंचितची ५०–५० फॉर्म्युल्यासह अधिकृत युती
चंद्रपूर : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला असून, चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी यांनी चंद्रपूर महानगरपालिकेसाठी अधिकृत युतीची घोषणा केली आहे.

या युतीअंतर्गत दोन्ही पक्षांनी ५०–५० टक्के जागावाटपाचा समसमान फॉर्म्युला निश्चित केला असून, त्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात एकत्र येताना दिसणार आहेत.
नगरपरिषद निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राज्यभरात पक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता महानगरपालिका निवडणुकांमध्येही नवी समीकरणे जुळताना दिसत आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी ठाकरे गट आणि वंचित यांची ही युती केवळ निवडणूकपुरती नसून, शहराच्या विकासासाठी आणि स्थानिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी करण्यात आल्याचे दोन्ही पक्षांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

चंद्रपूरचा रखडलेला विकास, वाढते प्रदूषण, आरोग्याच्या समस्या आणि स्थानिक युवकांचा रोजगार हा या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. मुंबईनंतर आता चंद्रपूरमध्येही युती यशस्वी करण्यासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने ५०–५० चा फॉर्म्युला स्वीकारल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दोन्ही पक्षांच्या जिल्हा प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या युतीचे स्वागत करत, “चंद्रपूरच्या परिवर्तनासाठी आम्ही सज्ज आहोत,” असा निर्धार व्यक्त केला आहे. या युतीमुळे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक अधिक चुरशीची होणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.





