मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या कार्याचे आणि व्यक्तिमत्त्वाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभात पवारांनी लिहिलेल्या लेखातून त्यांनी फडणवीस यांच्या कामाचा झपाटा, हजरजबाबीपणा आणि प्रशासनावरची पकड या गुणांचे कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मला, मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो, असे पवार यांनी लेखात म्हटले आहे.
फडणवीस कायद्याचे पदवीधर असल्याने ते “पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल” आहेत, असे पवारांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, फडणवीस यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य आहे, जी त्यांची जमेची बाजू आहे. याच गुणांमुळे आणि उपजत बुद्धिचातुर्यामुळे त्यांनी सत्तेत नसतानाही आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरीही “वाखाणण्याजोगी” होती, असे पवारांनी सांगितले. याच कामगिरीचे फलित म्हणून तरुण वयात त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आणि त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला, असेही पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ पुस्तकात उद्धव ठाकरे यांनीही एक लेख लिहिला आहे. या लेखात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी एक आदर्श राजकारणी म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती. हा वारसा अतिशय मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे कार्य देवेंद्र गंगाधरराव फडणवीस करत आहेत.
ठाकरे पुढे म्हणतात की, देवेंद्र आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे २०१४ ते २०१९ दरम्यान आम्ही त्यांच्या सोबत होतो. त्यामुळे त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. नंतरच्या काळात त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची धडपडही जवळून पाहता आली. देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत.
एकंदरीत, देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकाने राजकीय वर्तुळात कोणाच्या मागे कुणाची शक्ती आहे हे
समजू शकते.