ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पत्रकार परिषदेत सवाल
मुंबई : सहा वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदान बंद होत आहे. त्यामुळे आम्ही पाच वाजता पत्रकार परिषद घेत आहोत. आम्ही शरद पवार यांना विचारू इच्छितो की, चार दिवसांपूर्वी त्यांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ? त्याचे कारण काय होते ? असे सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना विचारले आहेत. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आम्ही उमेदवार दिला नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विजयासाठी काम करायला सांगितले होते, असेही त्यांनी सांगितले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, राजनाथ सिंह यांच्यासोबत शरद पवार यांचे काय बोलणे झाले आहे हे आम्ही विचारू इच्छितो. राष्ट्रवादीच्या 5 जागांसंदर्भात चर्चा झालीय का ? किंवा एकनाथ शिंदे मुंबईच्या तीन जागा लढत आहेत, त्यासंदर्भात चर्चा झालीय का? किंवा उध्दव ठाकरे यांच्याबाबत चर्चा झालीय का ?
जेव्हा महाविकास आघाडीसंदर्भात चर्चा चालू होती. तेव्हा आम्ही एक मुद्दा मांडला होता की, आपण धर्मनिरपेक्ष मतांवर जिंकणार आहोत. त्यासाठी आपल्याला धर्मनिरपेक्ष मतदारांना आश्वासित केले. पाच वर्षे भाजपसोबत जाणार नसल्याचे सार्वजनिकरीत्या सांगितले पाहिजे, याचीही आठवण आंबेडकर यांनी करून दिली.