नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११३ वा दीक्षांत समारंभ नुकताच ‘नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज’च्या सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील एम.एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी) ची विद्यार्थिनी सायली ज्योती सदानंद चक्रे हिने विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकावर (Gold Medal) आपले नाव कोरले.
हा गौरव सोहळा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. व्यासपीठावर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्यात सायलीला सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. अनंत पंढरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशामुळेच विद्यापीठाची आणि शिक्षण संस्थांची उंची वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त क्षमता ओळखून त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करावे.”
कुलगुरू डॉ. क्षीरसागर यांनी सुवर्ण पदक विजेत्यांचे कौतुक करताना आवाहन केले की, “विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी मर्यादित न ठेवता समाजहित, पर्यावरण संरक्षण आणि समता प्रस्थापित करण्यासाठी करावा.”
आपल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सायली चक्रे म्हणाली की, “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, श्रम प्रतिष्ठा आणि नैतिक आचरण ही माझ्या जीवनाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
पदवी शिक्षणादरम्यान ‘कमवा आणि शिका (Earn and Learn) या योजनेतून मिळालेल्या अनुभवामुळेच मी हे यश संपादन करू शकले.” सायलीने आपल्या या यशाचे श्रेय तिचे आई-वडील, मार्गदर्शक प्राध्यापक आणि आप्तेष्टांना दिले.






