पुणे : सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिकच्या वतीने आज पुण्यात बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या ब्लॅक लिस्टेड क्लासेसना दिलेल्या बेकायदेशीर टेंडरविरोधात निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनादरम्यान आंदोलनाच्या प्रतिनिधींनी अशा क्लासेसचे गंभीर गैरव्यवहार, विद्यार्थ्यांची झालेली लूट आणि भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे मांडले. त्यांनी मागणी केली की, विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ब्लॅकलिस्टेड खाजगी क्लासेसना दिलेली सर्व टेंडर त्वरित रद्द करण्यात यावीत. यापुढे अशा कोणत्याही संस्थांना टेंडर देणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी थेट खेळ ठरेल.
समाज कल्याणासाठी असलेला निधी हा वंचित व शोषित विद्यार्थ्यांच्या खऱ्या प्रगतीसाठी वापरला गेला पाहिजे, भ्रष्टाचारासाठी नव्हे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, सात दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल.
भ्रष्ट संस्थांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही या आंदोलनाच्या झळा सोसाव्या लागतील, असेही आंदोलनकर्त्यांनी बजावले. हे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक जिल्हाध्यक्ष मिहिर प्रमोद गजबे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी आदित्य बाळासाहेब निरभवणे, सुरज दीक्षा सुदाम, सिद्धांत मनीष बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.