अकोला : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या जेवणातील निकृष्ट व्यवस्थेविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने जोरदार निषेध नोंदवला आहे. वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या फळांमध्ये आळ्या आढळून आल्या असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोल्याच्या वतीने समाजकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जेवण पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक व शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खिलवाड करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

समाजकल्याण विभागाने या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष स्वरूप इंगोळे, प्रसिद्धी प्रमुख अंकित इंगळे, सोशल मीडिया प्रमुख अंकुश धुरंधर, सचिव राहुल खाडे यांच्यासह मंगेश बलखंडे, सोमेश दाभाडे, प्रकाश पाटील, मनीष लंगोट तसेच इतर कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.





