रशिया : रशियाच्या पूर्वेकडील अमूर प्रदेशात गुरुवारी एक मोठी आणि भीषण विमान दुर्घटना घडली आहे. सायबेरियास्थित ‘अंगारा’ एअरलाइन्सचे अँटोनोव्ह An-24 (Antonov An-24) प्रवासी विमान कोसळले. या विमानात 5 मुलांसह 43 प्रवासी आणि 6 क्रू सदस्य असे एकूण 49 जण प्रवास करत होते. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाला विमानाचे जळलेले अवशेष सापडले असून, खराब हवामान आणि वैमानिकाची चूक (क्रू एरर) अपघातामागे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लँडिंगपूर्वीच संपर्क तुटला
’अंगारा’ एअरलाइन्सच्या अँटोनोव्ह An-24 या विमानाने उड्डाण केले होते आणि ते चीनच्या सीमेला लागून असलेल्या अमूर प्रदेशातील ट्यिंडा (Tynda) शहराकडे जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमान आपल्या निश्चित स्थळी पोहोचत असताना आणि लँडिंगची तयारी करत असतानाच अचानक रशियन हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचा (Air Traffic Control) विमानाशी संपर्क तुटला. काही क्षणांतच विमान रडारच्या स्क्रीनवरूनही गायब झाले, ज्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. प्रादेशिक गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात सहा क्रू सदस्यांसह 43 प्रवासी होते, ज्यात पाच मुलांचा समावेश होता.
रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने तातडीने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी बचाव हेलिकॉप्टर रवाना केले. काही तासांच्या शोधमोहिमेनंतर बचाव पथकाला विमानाचे अवशेष सापडले. आपत्कालीन मंत्रालयाने टेलिग्रामवर माहिती दिली की, रोसाव्हियात्सिया (रशियाचे नागरी विमान वाहतूक प्राधिकरण) द्वारे संचालित Mi-8 हेलिकॉप्टरला विमानाचे जळलेले अवशेष दिसले आहेत. विमानाचे अवशेष दुर्गम भागात सापडले असून, ते पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होते. या दृश्यांमुळे विमानातील कोणीही वाचले असण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली आहे.
अपघातामागे ‘क्रू एरर’ ची शक्यता
रशियन वृत्तसंस्था ‘Tass’ ने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातामागे प्राथमिकदृष्ट्या ‘क्रू एरर’ म्हणजेच वैमानिकाकडून झालेली चूक हे प्रमुख कारण मानले जात आहे. लँडिंगदरम्यान हवामान खराब होते आणि दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. अशा परिस्थितीत विमान उतरवताना वैमानिकाकडून चूक झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तथापि, अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
जुन्या विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अपघातग्रस्त झालेले अँटोनोव्ह An-24 हे विमान 1950 च्या दशकात विकसित केले गेले होते. हे जुने मॉडेल असले तरी, रशियामध्ये प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आतापर्यंत या विमानाचे 1000 हून अधिक युनिट्स तयार करण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे या जुन्या विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेमुळे रशियातील हवाई वाहतूक सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात 30 जुलै रोजी सुनावणी!
दिल्ली : शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले...
Read moreDetails