औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील रेवलगाव येथील रेवलगाव सोसायटीचे चेअरमन सलीम खॉ अमीन खॉ पठाण यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला कन्नड तालुक्यात नवे बळ प्राप्त झाले आहे.
या प्रवेश सोहळ्याच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी सलीम खॉ पठाण यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सलीम खॉ पठाण यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “वंचित बहुजन आघाडी ही खऱ्या अर्थाने वंचित, शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेचा आवाज आहे. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्यासाठी मी या चळवळीत सहभागी होत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी पठाण यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना सांगितले की, “त्यांच्या सहभागामुळे कन्नड तालुक्यात वंचित बहुजन आघाडी अधिक मजबूत होईल आणि संघटन विस्ताराला गती मिळेल,” असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, तसेच रेवलगाव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.





