मुंबई(८ डिसेंबर) : मुंबईमधील आझाद मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इस्राईल – पॅलेस्टाईन मध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या वाढीमुळे होत असलेल्या परिणामांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आणि तेथील परिस्थिती पूर्वपदावर यावी. यासाठी भारताने प्रयत्न करावेत यासाठी शांती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या शांती सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. देशातील जेवढे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत, त्यांचे जेवढे संसदेतील खासदार आहेत त्यांनी संसदेत इस्राईल – पॅलेस्टाईन या दोन्ही देशात शांतीसेना पाठवण्याचा ठराव मंजूर करुन घ्यायला हवा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची एक नवीन प्रतिमा तयार होत आहे. एक आर्थिक ताकद म्हणून भारत पुढे येत आहे आणि याच आर्थिक ताकदीच्या जोरावर भारत अन्य देशांवर प्रभाव टाकू शकतो. त्यामध्ये इस्राईल देखील येते. पण सरकार दोन बाजूने बोलत आहे. प्रधानमंत्री इस्राईलच्या बाजूने बोलले आणि २४ तासानंतर कॅबिनेट सचिवाने म्हटले की, भारत सरकारची भूमिका आणि कॅबिनेट चा निर्णय असा आहे की आम्ही पॅलेस्टिनी जनतेसोबत आहोत.असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मी इथल्या सरकारला सांगू इच्छितो की, कोण कोणासोबत आहे किंवा कोणासोबत नाही हे बघण्यापेक्षा हे लक्षात घ्यावं की, इथला प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आहे, हा भारत स्वतंत्र भारत आहे. राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी इस्राईल आणि पॅलेस्टाईन संघर्षाबाबत ठाम भूमिका घ्यायला हवी असे त्यांनी यावेळी म्हटले.
यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांना देखील सुनावले आहे. ते म्हणाले की,काँग्रेस आणि सपा स्वतःला धर्मनिरपेक्ष पक्ष समजतात. संसदेच्या अधिवेशनात इस्राईल – पॅलेस्टाईन मध्ये शांती राहण्यासाठी आणि यांच्या संघर्षावर उपाय काढण्यात यावा याचा ठराव संमत करण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न व्हावा.
काँग्रेस आणि समाजवादी पार्टी चे लोक संसदेत आहेत. त्यांना मी आग्रह करतो की इस्राईल – पॅलेस्टाईन संदर्भात तुम्ही संसदेत चर्चा करावी.असेही त्यांनी म्हटले आहे.
इस्राईल – पॅलेस्टाईन संघर्ष वाढला तर मध्य आशियातील ८० लाख भारतीयांना भारतात सुरक्षित आणावं लागेल. यात भारताची तिजोरी रिकामी होईल. ही फक्त मुस्लिमांची समस्या नाही आहे तर संपूर्ण जगाची समस्या आहे. असे म्हणत ॲड. आंबेडकरांनी महत्वाच्या प्रश्नावर लक्ष वेधले आहे.
देशातील कोणताही पक्ष इस्राईल आणि पॅलेस्टाईन प्रश्नावर बोलायला तयार नाही आणि कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाही. केंद्र सरकार देखील यावर उदासीन दिसत आहे. अशा वेळी भारताच्या परराष्ट्र धोरणावर याचा परिणाम होऊ शकतो याचा विचार कोणताही पक्ष करताना दिसत नाही. मात्र वंचित बहुजन आघाडी या पक्षाने आणि ॲड. प्रकाश आंबेडकरांनी या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत आज आझाद मैदानावर शांती सभा घेत इतर पक्षांना देखील ठाम भूमिका घेण्याचे आणि पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.