भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करून क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाब्बा कसोटीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली होती. त्यावेळी, त्याने आयपीएल खेळत राहणार असल्याचे सांगितले होते, पण आता त्याने आपला निर्णय बदलला आहे.
अश्विनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या निवृत्तीची माहिती दिली. “आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आणि एका नव्या सुरुवातीचा संकेत आहे. मी माझ्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम देत आहे, परंतु जगभरातील विविध टी-20 लीग्समध्ये खेळत राहीन,” असे त्याने लिहिले आहे. बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएलने दिलेल्या संधीबद्दल त्याने आभार मानले.
अश्विनने यावर्षी आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले, पण त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्याच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामागे चेन्नई सुपर किंग्जसोबतचे मतभेद असल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच त्याने चेन्नई संघाबद्दल काही वादग्रस्त विधाने केली होती, ज्यामुळे त्याची आयपीएल कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. २७ ऑगस्ट रोजी हेच खरे ठरले.
आर. अश्विनची आयपीएलमधील कामगिरी
अश्विनची आयपीएलमधील कारकीर्द खूप प्रभावी राहिली आहे. त्याने एकूण २२० सामन्यांमध्ये १८७ विकेट्स घेतल्या आहेत आणि फलंदाजीमध्ये ८३३ धावा केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये पाच वेगवेगळ्या संघांकडून खेळला आहे. यात चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांचा समावेश आहे. पंजाब किंग्जचे कर्णधारपदही त्याने भूषवले आहे.