पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि सहायक आयुक्त समाजकल्याण पुण्यातील संविधान प्रेमी नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त ‘वॉक फॉर संविधान’ रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, यशदाचे उप महासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, बार्टीचे निबंधक विशाल लोंढे, बार्टीचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक सुनिल वारे, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी तथा बार्टी विभागप्रमुख मारोती बोरकर, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, उपायुक्त वृषाली शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे, बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी, विविध विद्यालय, महाविद्यालयाचे विद्यार्थी, महार रेजिमेंटचे माजी सैनिक, नागरिक उपस्थित होते.
यावेळी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेच्या प्रतिमेस डॉ. पुलकुंडवार, वारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. रॅलीमध्ये महापुरुषाच्या वेशभूषेत शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी संविधानाच्या जागृतीचे फलक घेऊन संविधानाच्या घोषणा देत होते. ढोल ताशाच्या गजरामध्ये व लेझीम पथकाच्या निनादांमध्ये ही रॅली काढण्यात आली.

‘वॉक फॉर संविधान’ रॅलीला भिडेवाडा येथून सुरुवात झाली आणि ती पुढे लाल महाल-दारुवाला पुल-फडके हौद-१५ ऑगस्ट चौक-जुनी जिल्हा परिषद यामार्गे मार्गक्रमणकरीत पुणे स्टेशन परिसरातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन विशाल लोंढे यांनी केले.
सामुदायिक वाचन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. पुणे शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनसीसी चे विद्यार्थी, अधिकारी बार्टी व सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीचे आभार सतीश गायकवाड यांनी मानले.





