पुणे : लोकशाहीचा उत्सव म्हणून ज्या निवडणूक प्रक्रियेकडे पाहिले जाते, त्याच प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर आज पुण्यातील धायरी भागात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. “एक मत, एक व्यक्ती” या तत्त्वाला हरताळ फासत, चक्क हातावरील शाई पुसून बोगस मतदान करण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. यंदा निवडणूक आयोगाने वापरलेले ‘मार्कर पेन’ हे ‘नावाला’च असल्याचे सिद्ध झाले आहे.
नेमका प्रकार काय?
धायरी परिसरातील मतदान केंद्रावर सकाळी काही महिलांची संशयास्पद हालचाल लक्षात पहायला मिळाले. एकच महिला वारंवार केंद्रात जात असल्याचे दिसले. धक्कादायक म्हणजे, मतदानाचा पुरावा म्हणून बोटावर लावलेली शाई साध्या लिक्विडने सहज पुसली जात असल्याचे यावेळी दिसून आले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पुणेकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ही शाई साध्या पाण्याने किंवा लिक्विडने काही सेकंदात पुसली जात आहे. शाई टिकत नसल्याने एकाच व्यक्तीला अनेकदा मतदान करणे सहज शक्य झाले आहे.
आयोगाचा हा प्रयोग म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. जर शाईच टिकत नसेल, तर पारदर्शक निवडणुका कशा होणार? असा संतप्त सवाल स्थानिक मतदारांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे पुण्यातील इतर मतदान केंद्रांवरही तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली आहे.





