बीड : बीड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नद्या-नाले ओसंडून वाहू लागल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. कपाशी, बाजरी, सोयाबीन तसेच फळवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासोबतच नदीकाठच्या गावांतील अनेक घरांची पडझड झाली असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किरण वाघमारे यांच्या नेतृत्वात बीड तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या उरलेल्या आशादेखील पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना थेट नुकसानभरपाई द्यावी.
तसेच पिकविमा रकमेचे सरसकट वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. निवेदनाद्वारे आणखी स्पष्ट करण्यात आले की, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान केवळ शेतकऱ्यांपुरते मर्यादित नसून सर्वसामान्य नागरिकांनाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना देखील शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावेळी वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष किरण वाघमारे, डॉ. गणेश खेमाडे, रोहन मगर, पुष्पाताई तुरुकमाने, जंजाळ सर, आकाश साबळे, महादेव गव्हाणे, अक्षय गायकवाड, विनोद वाघमारे, पांडुरंग वाघमारे, महादेव वाघमारे, गौतम वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या गंभीर संकटावर शासनाने तातडीने उपाययोजना करून योग्य मदत दिली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.