अकोला : बहुजन समाजातील लहान लहान जातींना सत्तेत स्थान देऊन त्यांचा मान सन्मान वाढवण्याचे काम ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच वंचितांचे रक्षणही त्यांनी केले आहे. असे प्रतिपादन बेलदार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. यशवंत भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले की, बेलदार समाज हा महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात पसरलेला आहे. भटकंतीवर असलेल्या या समाजाला न्याय देण्याचे काम प्रकाश आंबेडकर यांनी केले. मी महाराष्ट्रातील बेलदार समाजाला आवाहन करतो की, त्यांनी अकोल्या लोकसभा मतदारसंघात ॲड. आंबेडकर यांना तर अन्य ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा आणि वंचितच्या उमेदवारांना निवडून आणावे.
मोदी सरकारने आणलेला सी.ए.ए या कायद्याचा फटका सर्वाधिक बेलदार समाजाला बसणार आहे. कारण या कायद्यानुसार जन्माचा मूळ गावाचा पुरावा मागितला जातो. बेलदार समाज हा मजुरीसाठी सतत भटकत राहतो. त्यांच्याकडे जन्माचे पुरावे मिळणे कठीण असते. अशावेळी त्यांना भारत सरकारच्या कोणत्याही सोयी सुविधा मिळणार नाहीत, म्हणजेच या समाजावर हा एक प्रकारे अन्याय ठरेल त्यामुळे हा कायदा थांबवायचा असेल तर संसदेमध्ये प्रकाश आंबेडकर असणे अत्यंत जरुरीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष, सचिव आणि बी, पी सावळे, मीडिया प्रमुख ॲड.नरेंद्र बेलसरे, विकास सदाशिव यांची उपस्थिती होती.