अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये भव्य जाहीर सभा पार पडली. नवीन तारफैल भागातील गाजिया मस्जिद जवळ आयोजित या सभेला जनसामान्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
सभेला संबोधित करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्थानिक समस्यांपासून ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांनी प्रभाग क्रमांक ७ मधील नागरी सुविधा आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आता परिवर्तनाची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी उपेक्षित आणि वंचित घटकांनी एकत्र येऊन आपली राजकीय ताकद दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रचंड जनसमुदाय आणि उत्साह
गाजिया मस्जिद परिसरातील या सभेसाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी लगबग पाहायला मिळत होती. ‘जय भीम’ आणि वंचित बहुजन आघाडीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सभेला महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती, ज्यामुळे सभेचे रूपांतर एका मोठ्या शक्तीप्रदर्शनात झाले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी आणि प्रभाग क्रमांक ७ मधील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेमुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, वंचित बहुजन आघाडीने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केल्याचे चित्र दिसत आहे.





