अहमदनगर : नेवासा तालुक्यातील वडुले गावात आत्महत्या केलेल्या तरुण शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांच्या कुटुंबियांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या बाबासाहेब सरोदे यांनी सरकारी मदतीच्या अभावामुळे आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
बाबासाहेब सरोदे यांच्या निधनानंतर त्यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबाची विचारपूस करत धीर दिला. या भेटीदरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. किसन चव्हाण हे देखील उपस्थित होते.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतकरी सरोदे यांना अपेक्षित मदत मिळाली नसल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू आहे.