मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) गंभीर आरोप करत मतदारांना मोठे आवाहन केले आहे.
आरएसएस-भाजपचा देशातील राजकीय पक्ष संपवण्याचा अजेंडा असून, या धोक्याला तोंड देण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकरवादी मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे ट्विट त्यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (X) हँडलवरून केले आहे.
RSS-भाजपवर गंभीर आरोप
ॲड. आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आरएसएस आणि भाजपचा राजकीय पक्ष संपवणे हा एक अजेंडा आहे आणि बिहारच्या निवडणुकीत ते दिसून आले आहे.” त्यांनी अन्य विरोधी पक्षांच्या स्थितीवरहीभाष्य केले.काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहू शकेल की नाही, याबाबत शंका आहे.
राष्ट्रीय जनता दलाला (RJD) त्यांनी कुटुंबाचा पक्ष म्हणून शिक्का मारला आहे, ज्यामुळे त्याच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. अशा गंभीर राजकीय पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणुका होत असल्याचे त्यांनी नमूद केले. फुले-शाहू-आंबेडकरवादी मतदारांना आवाहन राजकीय पक्षांना संपवण्याच्या या कथित अजेंड्याचा मुकाबला करण्यासाठी ॲड. आंबेडकरांनी ठाम भूमिका घेतली.
त्यांनी तमाम फुले, शाहू, आंबेडकरवादी, मानवतावादी आणि लोकशाहीवादी मतदारांना थेट आव्हान केले आहे.”वंचित बहुजन आघाडी सातत्याने आरएसएस-भाजपा विरोधात लढत आहे. आपल्या सर्वांना आव्हान आहे की, आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा,” असे आवाहन त्यांनी केले.






