मुंबई : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील निर्णायक क्षणाची आठवण करून देत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज “संविधान सन्मान महासभा” आयोजित करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले शेवटचे भाषण हे भारतीय लोकशाहीच्या मार्गक्रमणासाठी आधारस्तंभ मानले जाते.
या भाषणात धर्मापेक्षा राष्ट्राला प्राधान्य, समानता–स्वातंत्र्य–बंधुता या मूल्यांवर आधारित सामाजिक लोकशाहीची आवश्यकता आणि संविधानावरील अविचल निष्ठा यांविषयी त्यांनी दिलेला इशारा आजही तितकाच महत्त्वाचा आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संध्याकाळी ५ वाजता संविधानाच्या गौरवार्थ “संविधान सन्मान महासभा” आयोजित करण्यात आली आहे. या महासभेत सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि संविधान बचावाच्या दिशेने महत्त्वपूर्ण चर्चा तसेच मार्गदर्शन दिले जाणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संविधानप्रेमी नागरिक, फुले–शाहू–आंबेडकर विचारवंत, मानवतावादी आणि सर्व लोकशाहीवादी जनतेला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. देशभरातील मान्यवर व्यक्ती आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी या सभेला उपस्थित राहणार असून संविधानिक मूल्यांवरील राष्ट्रीय चर्चा अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.





