पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता सडकून टीका केली आहे. देशात सध्या सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाचा अभाव असल्याचं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सनातन हिंदुत्ववाद्यांचे पंतप्रधान आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
राहुल गांधी यांच्यावर टीका
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाल, राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’चा मुद्दा उपस्थित करण्याऐवजी सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाचा मुद्दा हाती घ्यायला हवा होता. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की, सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाची कोणतीही माहिती नाही. त्याबाबतचे चित्रीकरणही उपलब्ध नाही. त्यामुळे सायंकाळी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि राहुल गांधी चुकीच्या व्यवस्थेविरोधात लढत आहेत, असे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘जरांगे हे रयतेतील मराठ्यांसाठी लढत असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात त्यांचे राजकारण निजमाताली मराठ्यांसाठी चालले आहे. रयतेतील गरीब मराठ्यांसाठी लढा उभारण्याची संधी त्यांना गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळाली होती. मात्र त्यांनी ती गमाविली. स्वतःचे राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करून त्यांना आरक्षण मिळविता आले असते. लोकांच्या उत्साहाला जोर देण्याएवेजी ते पुन्हा लढ्याची भाषा करत आहेत.’
आंबेडकरी चळवळीतील नेते एकत्र आहेत. मात्र ते वीस वर्षे सत्ताधारी होऊ शकणार नाहीत. समाजातील एक वर्ग वंचितांना कधीच मतदान करणार नाही. हा वर्ग तीस टक्के आहे. वंचित समाजाचा प्रतिनिधी निवडून आला तर स्पर्धक वाढले, हे त्यामागील कारण आहे. ही परिस्थिती बदण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र त्याला अजून अवधी लागणार आहे. त्यामुळे पुढील वीस वर्षे सत्ता लांब असेल, असा दावाही प्रकाश आंबडेकर यांनी केला.