बीड : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे जाऊन डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. डॉ. मुंडे यांच्या निधनानंतर ॲड. आंबेडकरांनी मुंडे कुटुंबियांचे सांत्वन करतानाच, या प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी अधिक व्यापक करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंडे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, सविता मुंडे, किसन चव्हाण, तसेच जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

एसआयटी चौकशी आणि गंभीर आरोप
पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावर आणि महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणावर राजकीय हस्तक्षेपाचा आणि पोलिसांच्या चुकीच्या माहितीचा गंभीर आरोप केला आहे.
एसआयटी चौकशी मान्य करणे स्वागतार्ह असले तरी, या चौकशीत गेल्या वर्षभरात डॉ. मुंडे यांच्या देखरेखीखाली झालेल्या सर्व शवविच्छेदन (Post-Mortem) प्रकरणांची कसून चौकशी करण्यात यावी.डॉ. मुंडे यांच्यावर कामाचा जो मोठा दबाव होता, त्यासाठी जबाबदार असणारे डॉक्टर, पोलीस अधिकारी, राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांची चौकशी व्हावी आणि त्यांना फोन करणाऱ्यांच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी करावी. मुख्यमंत्र्यांनी डॉ. मुंडे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन तात्काळ पूर्ण करावे.
चुकीचे ‘ब्रीफिंग’ देणाऱ्यांवर कारवाई:
डॉ. संपदा मुंडे किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणांमध्ये जर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती (ब्रीफिंग) दिली असेल, तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.पीडित कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीची मदतया प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्रिय भूमिका घेत असून, संस्थापक सदस्य ॲड. विजय मोरे हे फलटण कोर्टात कुटुंबाला सर्वतोपरी मदत करतील. आरोपी कितीही मोठे असले तरी, त्यांना शिक्षा मिळावी यासाठी दक्षता घेतली जाईल, असे ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर टीका
ॲड. आंबेडकरांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर टीका करताना म्हटले की, पोलीस विभागावरील शासनाचा ताबा सुटला असून, पोलीस बेभान झाले आहेत. डॉ. पायल तडवी यांच्यासारख्या संवेदनशील प्रकरणांना न्याय न मिळाल्याने ती प्रकरणे दाबण्यात आली. आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत सिस्टीमवर वचक बसणार नाही.
बीड जिल्ह्यातील मराठा आणि वंजारी समाजातील वाद राजकीय मंडळींकडून मतांच्या राजकारणासाठी विकोपाला नेण्याचा प्रयत्न होत आहे. शासनही जात आणि धर्म बघून वागत आहे, हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी या वादात त्वरित लक्ष घालून शांतता प्रस्थापित करावी आणि बीडच्या नागरिकांचा होणारा अवमान थांबवावा, असे आवाहन त्यांनी केले.
महिला आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून हटवण्यापेक्षा, त्यांच्या विचारांमध्ये मनुवादी विचारधारेऐवजी संतांच्या विचारधारेचा रिफॉर्म (परिवर्तन) घडवून आणणे अधिक महत्त्वाचे आहे, केवळ व्यक्ती बदलल्याने मूळ विचारसरणी बदलत नाही, असे मत ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केले.





