शरद पवार तर भाजपचे हस्तकच – ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी निवडणुकीत मोदींच्या पक्षाला सत्तेतून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विरोधकांना ‘लकवा मारला’ असल्याचा आरोप करत आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावरही भाजपचे ‘हस्तक’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सध्या देश एका व्यक्तीमुळे अडचणीत सापडला आहे. जागतिक स्तरावर भारताला घेरण्याचे प्रयत्न सुरू असताना, ‘व्यक्ती की देश’ असा प्रश्न उभा राहिला आहे. हे सर्व केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. देशाला या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर मोदींच्या पक्षाला पुन्हा सत्तेवर येऊ देऊ नये. जर तुम्ही त्यांना बळी पडलात, तर देशाला बळी द्याल, असा इशाराही त्यांनी दिला. देशातील मतदार याबाबत शहाणपणाने निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
’१४० कोटींमधून कोणीतरी पुढे येईल’
देशाला पर्याय कोण असेल, यावर विचार करू नका, असे सांगत आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षापासून देशाला वाचवणे हेच सध्या महत्त्वाचे आहे. १४० कोटींच्या या देशात कोणीतरी निश्चितच पुढे येऊन नेतृत्व करू शकतो, यावर विश्वास ठेवा. नरेंद्र मोदी यांनी निवृत्त झाल्यास देशाला घेरण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, ते थांबतील, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
शरद पवार भाजपचे ‘हस्तक’ असल्याचा आरोप
’इंडिया’ आघाडी आणि ‘महाविकास आघाडी’च्या दिल्लीतील बैठका झाल्या असल्या, तरी शरद पवार यांच्यावर आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले. शरद पवार हे भाजपचे हस्तक असून ते त्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाहीत. देशाच्या राजकारणात घडामोडी करणारे लोक वेगळे आहेत आणि तुमच्या समोर दिसणारे लोक वेगळे आहेत.
राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यात मोदींना आव्हान देण्याची हिंमत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींना विरोध करू शकत नाहीत, असे ते म्हणाले. १५ दिवसांत देशाच्या राजकारणात एक नवीन बातमी कळेल, असा मोठा दावाही त्यांनी केला.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर भूमिका
यावेळी त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. व्हीव्हीपॅट नसेल तर निवडणुकीत सहभागी होणार नाही, असे विरोधकांनी जाहीर करावे. व्हीव्हीपॅट असेल तरच निवडणुकीत सामील व्हा, अन्यथा बॅलेट पेपरचा वापर करण्याची मागणी करा. या सगळ्या घडामोडींमध्ये विरोधक कुठेही दिसत नाहीत आणि त्यांना कोणीही विचारत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका
शरद पवार तर भाजपचे हस्तकच - ॲड. प्रकाश आंबेडकरमुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान...
Read moreDetails