पैठण : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी ‘प्रबुद्ध भारत’ सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. यामागचा मुख्य उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या “जनता” वृत्तपत्राची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर ‘जनता’ या वृत्तपत्राचे नामकरण ‘प्रबुद्ध भारत’ असे केले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे ‘प्रबुद्ध भारत’चे संपादक म्हणून काम पाहत आहेत.
अभियानाचा उद्देश म्हणजे शोषित, वंचित, एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. आणि मुस्लिम समाजाच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण, आरक्षणाचा लढा तसेच सध्याच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय भूमिकेची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या हेतूने यंदा पैठण शहर व तालुक्यात हे अभियान राबविण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या स्वतंत्रता, समता, बंधुता आणि न्याय या संविधानाच्या मूलतत्त्वांचे पालन करून व अंगीकार करून हे अनोखे अभिवादन करण्यात आले.

या अभिवादन रॅली आणि अभियानाच्या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक भारत आठवले, वंचितचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सतीश बोरुडे, शाहीर सुरेश सदावर्ते, डॉ. पंडित किल्लारीकर, दत्ता वाहुळे, गंगाधर म्हस्के, अरुण दादा बल्लाळ, हिवराळे सिस्टर, बनसोडे ताई, गणेश दाभाडे, भानुदास चाबुकस्वार यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव आणि महिला उपस्थित होते.






