अकोला : वंचित बहुजन युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे आयोजित भव्य धम्म मेळाव्याच्या निमित्ताने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशेषतः महिला सुरक्षा, शेतकरी समस्या आणि बहुजन विद्यार्थ्यांवरील अन्याय या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या मीनल मेंढे यांनी महाराष्ट्रातील महिलांच्या आणि तरुणींच्या असुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री सुरक्षित आहेत, पण राज्यातील महिला आणि तरुणी असुरक्षित आहेत. महाराष्ट्रात महिला अत्याचाराने कळस गाठला आहे. त्यांनी स्पष्टपणे मत मांडले की, या राज्यात महिला सुरक्षा फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच ठेवू शकतात.
शेतकरी मदतीवरून सरकारवर निशाणा
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांनी शेतकरी प्रश्नांवरून सरकारवर टीका केली. त्यांनी आरोप केला की, शेतकऱ्यांसाठी मदत द्यायला सरकारकडे निधी नाही, पण पेपरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वतःच्या करोडो रुपयांच्या जाहिराती देण्यास पैसे आहेत. घोगरे यांनी राज्यातील पीडित शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देण्याची मागणी केली. अन्यथा, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या सरकारला दणका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
बहुजन विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात लढ्याची घोषणा
सम्यक विद्यार्थी आंदोलन, अकोलाचे जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे यांनी बहुजन विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाच्या मुद्द्यावर सरकारला लक्ष्य केले. या मनुवादी फडणवीस सरकारने बहुजन विद्यार्थ्यांवर मोठे अन्याय करत आहे, असे ते म्हणाले.
आगामी काळात सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन मोठा लढा उभा करेल, अशी घोषणा धीरज इंगळे यांनी यावेळी केली.