औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचेच चित्र काही इतर पक्षातील कार्यकर्त्यांना ते पाहणे कठीण जात आहे.
औरंगाबाद येथे प्रभाग क्रमांक ५ मधील गरमपाणी परिसर येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वर्षा रतन जाधव आणि श्याम भारसाकले यांच्या प्रचार रिक्षेवर काही समाजकंटकांनी हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद तसेच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे रणधुमाळी दिसून येत आहे. मात्र, काही इतर पक्षातील कार्यकर्त्यांना टोचत असल्यामुळे हे कृत्य केल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ५ मध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रचार सुरू असताना काही जातीवादी समाजकंटकांनी प्रचार रिक्षेला अडवले. यावेळी रिक्षेवर असलेले युवा नेते सुजात आंबेडकर यांचा फोटो असलेले बॅनर फाडण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, समाजकंटकांनी रिक्षा चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यामुळे रिक्षेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळणारा वाढता जनपाठिंबा पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
लोकशाहीच्या मार्गाने लढा देण्याऐवजी आता विरोधक गुंडगिरीवर उतरले आहेत,” अशी टीका पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. अशा भ्याड हल्ल्यांनी पक्षाचा प्रचार थांबणार नाही, उलट जनताच आता मतदानातून या गुंडगिरीला उत्तर देईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.
प्रचार रिक्षेवर झालेल्या हल्ल्याची आणि चालकाला झालेल्या मारहाणीची दखल घेत, दोषी समाजकंटकांना त्वरित अटक करण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात झालेल्या या हिंसक घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






