नाशिक : सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक यांच्या वतीने त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी ‘एक दिवसीय लेणी अभ्यास कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी त्रिरश्मी बुद्ध लेण्यांच्या समृद्ध इतिहासाचा आणि प्राचीन कलेचा सखोल अभ्यास केला.
या कार्यशाळेत लेण्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, चैत्यगृह व विहाराची रचना, त्यातील शिल्पकला आणि महत्त्वाच्या शिलालेखांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. इतिहास आणि लेणी अभ्यासक संतोष आंभोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनामुळे विद्यार्थ्यांना आपल्या ऐतिहासिक वारशाची ओळख झाली, इतिहासाची गोडी लागली आणि आत्मविश्वास वाढला.
कार्यशाळेदरम्यान, सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शनही केले. त्यांनी स्वयं-रचित कविता, प्रेरणादायी गीते आणि इतर कला सादर करून कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांना ज्ञान, कला आणि आणि संस्कृतीचा संगम अनुभवण्याची एक अनोखी संधी ठरला.