नांदेड : ओबीसी आरक्षण धोक्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर, आज नांदेड येथे भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या महामोर्चात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी नेत्यांनी जोरदार टीका करत, आरक्षणावर आलेल्या संकटावर गंभीर चिंता व्यक्त केली.
४० वर्षांच्या संघर्षाचा दाखला आणि मंडल क्रांतीची आठवण
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, आपल्या ४० वर्षांच्या ओबीसी आरक्षणाच्या संघर्षाचा दाखला दिला. ते म्हणाले, “मी गेल्या सुमारे ४० वर्षांपासून ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. माझे मित्र, भारताचे माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग जी यांनी १९९० मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या.” ती लाट इतकी क्रांतीकारी होती की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), भाजप आणि आरक्षणविरोधी शक्ती थरथर कापू लागल्या होत्या. आज, पुन्हा एकदा तशाच सामाजिक न्यायाच्या लाटेची गरज आहे, कारण ओबीसी आरक्षण धोक्यात आहे. अशी १९९० मधील सामाजिक न्यायाच्या लाटेची आठवणही त्यांनी करून दिली.
‘आरक्षण धोक्यात, धर्म नाही’ – ॲड. आंबेडकरांचे स्पष्ट मत
शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण संपुष्टात:
“आज शिक्षणातले आरक्षण हे संपले आहे. नोकरीतले आरक्षण संपले आहे. कारण की, शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण केले आहे आणि नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने दिल्या जात आहेत. आता जे आरक्षण आहे ते केवळ ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगर पालिकापुरते राहिलेले आहे.
“भाजप म्हणत आहे धर्म संकटात आहे, पण ओबीसींनो समजून घ्या, धर्म संकटात नाही तर ओबीसींचे आरक्षण संकटात आहे.” अशी घणाघाती टीका त्यांनी भाजपवर केली.
भाजपने पाठीत खंजीर खुपसला – अविनाश भोसीकर
ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांनी भाजप आणि महायुतीवर हल्ला चढवला. ते म्हणाले, “ज्या प्रकारे बाहुबली चित्रपटात कटप्पाने पाठीत खंजीर खुपसून बाहुबलीचा जीव घेतला. त्याचप्रमाणे बहुसंख्य ओबीसी जो बाहुबली आहे, त्याच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसला.” भोसीकर यांनी ओबीसी समाजाला आपले राजकीय शत्रू ओळखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आपला शत्रू भाजप, महायुती आणि प्रस्थापित पक्ष आहेत, हे ओबीसींनी ओळखावे.”
या एल्गार महामोर्चात ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, आणि ओबीसीच्या विविध समाजांतील हजारो साथीदारही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नांदेडमधील या मोर्चातून ओबीसी समाजाने राज्य सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.





